Friday 17 December 2021

"बहामनी बिदर..."

     २८ ऑक्टोबर २०१३, माझ्या आणि बाबाच्या फोटो प्रदर्शनाला आमचे एक family friend जितेंद्र पावगी काका आले होते. प्रदर्शन बघून झाल्यावर त्यांनी आम्हाला विचारलं की नाताळच्या सुट्टीत बिदरला येणार का? ते कुठे आहे हे तर लांबच पण मी साधं बिदरचं नाव देखील ऐकलं नव्हतं. पण architectural photography मधली वाढलेली रुची स्वस्त बसली नाही आणि मी त्यांना लगेच हो म्हणून टाकलं. माझी सगळ्यात पटकन ठरलेली आणि सगळ्यात छोटी (कमी दिवसांची - महाराष्ट्राच्या बाहेर) ही ट्रिप आहे.

     आमच्या प्रदर्शनाच्या गडबडीनंतर पुन्हा काकांनी खात्री करण्यासाठी फोन केला. बाबाला जमणार नव्हतं पण मी आणि आईने आम्ही येतो असं कळवलं त्यांना. बिदरचं सर्व बुकिंग आणि रेल्वे बुकिंगही पावगी काकाच करणार होते. साधारण १५ नोव्हेंबरच्या आसपास आमचं सगळं बुकिंग झालेलं होतं.

     आमच्या बरोबर पावगी काका, त्यांचा मुलगा पार्थो, गाडगीळ कुटुंबीय ( जण) आणि शहा कुटुंबीय ( जण) असे आम्ही एकूण नऊ जण होतो. आमच्यामध्ये समान धागे होते. एक म्हणजे आम्ही मुलं एकाच शाळेत होतो (मी माजी आणि ते आजी विद्यार्थी होते तेव्हा.) आणि दुसरं म्हणजे इतिहास जुन्या वस्तूंची आवड!

     बिदर हे दख्खनच्या पठारावर - कर्नाटक राज्याच्या ईशान्येला वसलेलं एक शहर. Crown Of Karnataka या नावाने ओळखलं जाणारं. बिदरचं हवामान बऱ्यापैकी पुण्यासारखंच आहे - पावसाळ्यात बऱ्यापैकी पाऊस, मे महिन्यात तापलेलं आणि थंडीत गारठा ! जुन्या काळात बिदर 'मोहम्मदाबाद' या नावाने ओळखलं जायचं. सर्वात प्रथम राष्ट्रकुटांची राजधानी होती - मयूरखंडी; ती म्हणजेच आत्ताचं बिदर आणि कालांतराने ही राजधानी मान्यखेतला हलविण्यात आली; ते म्हणजे आत्ताचे गुलबर्गा ! नंतर बिदरवर राज्य केलं ते यादव, अल्लाउद्दीन खिल्जी मुहम्मद बिन तुघलक यांनी ! कालांतराने दख्खन पठाराचा हा भाग काबीज करून अल्लाउद्दीन हसन गंगू बाहमन शाह याच्या देखरेखीखाली बहामनी (बहमनी किंवा बाहमनी असं देखील म्हणतात.) साम्राज्य स्थापन झालं. तेव्हाच (१४२५) या साम्राज्याची राजधानी गुलबर्गा येथून पुन्हा बिदरला हलविण्यात आली. १५१८ पर्यंत हीच राजधानी टिकून होती पण त्यानंतर साम्राज्याची विभागणी झाली.


२५ डिसेंबर २०१३, बुधवार

     सकाळी .५० च्या 'पुणे सिकंदराबाद शताब्दी' ने आम्ही निघालो. ११ - ११.१५ च्या सुमारास गुलबर्ग्याला पोहचून; थोडं खाऊन by road बिदरला जायला निघालो. रस्ता तितकासा चांगला नव्हता पण दुतर्फा असणारी हिरवीगार शेतं आणि हिवाळ्यातील गारवा यामुळे गुलबर्गा ते बिदर हा तासांचा प्रवास अगदी सुखकर झाला. दुपारी च्या सुमारास बिदर येथील हॉटेल शिवा इंटरनॅशनल येथे चेक-ईन केले. त्यानंतर थोडा आराम करून आम्ही बारिद शाही बगीचा (Barid Shahi Garden) बघायला गेलो. पंधराव्या शतकाच्या सुरुवातीला बिदरचे अधिपत्य बारिद शाहांकडे आले. त्यातील कासीम बारिद कासीम बारिद दुसरा यांच्या कबरी तिथे आहेत. कासीम बारिद याचा मुलगा आमिरने हा समूह स्वतःच्या हयातीतच बांधायला सुरुवात केली होती परंतु तो अचानक दौलताबादला मृत्यू पावला. त्याची अर्धवट राहिलेली कबर सुद्धा तिथे आहे. शहराच्या पश्चिमेला वसलेल्या या कबरींभोवती एक बगीचा तयार केलेला आहे. प्रत्येक कबर ही एका चौथऱ्यावर बांधलेली आहे. तसेच त्या बागेत चालण्यासाठी रस्ते (walking tracks) आणि जुनी आंब्याची चिंचेची काही झाडे देखील आहेत.

     तेथून संध्याकाळी आम्ही नानक झिरा (Nanak Zara) बघायला गेलो. शीख गुरू नानक यांचे तीर्थस्थान तेथे आहे. गुरू नानक त्यांच्या दुसऱ्या धर्मप्रचार फेरीच्या वेळेस दक्षिण भारतात गेले. खांडवा - नागपूर, नर्मदेच्या काठावरील ओंकारेश्वर करून नांदेडला पोहोचले. त्यानंतर ते गोवळकोंडा हैद्राबाद येथील मुस्लिम संतांना भेटून याकूब अली पिर जलालुद्दीन यांना भेटायला बिदरला आले. त्यावेळेस ते त्यांच्या मर्दाना या सहचारिणी बरोबर जिथे राहिले होते; तेथेच हा नानक झिरा बांधलेला आहे. भारतातील अनेक जागांपैकी ही सुद्धा एक अतिशय पवित्र जागा मानली जाते.

     दर्शन घेऊन, वाटेतच कामत रेस्टॉरंटमध्ये जेवून आम्ही हॉटेलला परतलो.

२६ डिसेंबर २०१३, गुरूवार

     आजचा आमचा महत्वाचा प्लॅन होता तो म्हणजे बिदरचा किल्ला बघायचा. कर्नाटकच्या उत्तरेला वसलेला हा किल्ला भव्यतेचा एक उत्तम नमुना आहे. १३२१ - २२ मध्ये काकतीया राजवंशाकडून तुघलक राजवंशाच्या युवराजाने बिदरचा किल्ला ताब्यात घेतला. नंतर हाच युवराज दिल्लीचा 'सुलतान मुहम्मद बिन तुघलक' झाला.

     १३४७ मध्ये अल्लाउद्दीन बाहमन शाह याने बहामनी साम्राज्याची स्थापना केली आणि बिदर ताब्यात घेतले. पहिल्या अहमद शहाच्या काळात (१४२२ - १४८६) ही बहामनी साम्राज्याची राजधानी झाली. जुन्या किल्ल्याचे नवनिर्माण झाले त्याचबरोबर तिथे बागा, मशिदी, मदरसे आणि राजवाडे स्थापिले गेले. १६५६ मध्ये औरंगजेबाने बिदर काबीज करेपर्यंत हे साम्राज्य बारिद शाहांच्याच अधिपत्याखाली होते. अनेकांनी यावर अधिपत्य गाजवले असले तरी विजापूरगोवळकोंडा, अहमदनगर, बिदर बेरार ही ठिकाणं स्वतंत्रच होती. भारताच्या स्वातंत्र्यानंतर १९५६ मध्ये बिदर कर्नाटकचा भाग बनला.

     बिदर किल्ल्याची तटबंदी जवळपास .  किमीची आहे. ही तटबंदी, बुरूज, दरवाजे, आतील वास्तू - राजवाडे भग्नावस्थेत असले तरी आता ते नीट जतन केले आहेत. या किल्ल्यात एकूण २५ - ३० वास्तू आहेत. त्यातील तर दरवाजेच आहेत. किल्ल्याच्या आग्नेय दिशेला प्रवेशद्वारे (दरवाजे) आहेत. पहिला आहे मुख्य दरवाजा - जो पर्शियन पद्धतीचा आहे. दुसरा आहे शर्जा दरवाजा - ज्याच्या वरच्या भागात दोन्ही बाजूला वाघ कोरलेला आहे. हे वाघाचे चिन्ह अली म्हणजेच असादुल्लाह अल् गालिब याचे प्रतीक आहे. त्याच्या मतानुसार शत्रूपासून बचावासाठी हेच चिन्ह योग्य आहे. तसेच त्यावर पर्शियन लिपी असलेल्या रंगीबेरंगी फरशांचे तुकडे देखील आहेत. तिसरा आहे घुमट दरवाजा - या दरवाज्यावर असलेला घुमट हीच याची खासियत आहे. यावर कमानी देखील आहेत. या दरवाज्यांशिवाय फतेह दरवाजा, तलघाट दरवाजा, दिल्ली दरवाजा आणि मंडू दरवाजा असे दरवाजे देखील या किल्ल्याला आहेत.

     या किल्ल्यात मुख्य मशिदी आहेत. जामी मस्जिद सोलाह खंबा मस्जिद. सोलाह खंबा मशिदीचे मुख्य प्रार्थनास्थळ हे १८ खांबांच्या साहाय्याने तर मशिदीचा उरलेला भाग ६० खांबांच्या मदतीने उभा आहे. (पण नाव मात्र सोलाह खंबा मशिद आहे.) त्यावर छत आहे ज्यावर ८४ घुमट आहेत. या मशिदीच्या बाजूला दिवाण - - आम, तारकश महाल, गगन महाल या भव्य वास्तू आहेत. भग्नावस्थेत असल्या तरी त्यांची भव्यता जाणवतेच ! याच परिसरात कोरीवकाम केलेल्या मूर्ती, तोफा, दरवाजे यांचे अवशेष ठेवलेले आहेत.

     हे सर्व बघून, त्याचे मनसोक्त फोटो काढून आम्ही पुन्हा घुमट दरवाज्यापाशी आलो. घुमट दरवाज्याच्या एका बाजूला पुरातन वास्तू संग्रहालय आहे. ज्यात बहामनी काळातील हत्यारे, वस्त्रे, स्वयंपाकाची साधने, इतर वस्तू अवशेष तसेच काही दुर्मिळ चित्रे - छायाचित्रे देखील आहेत.

     ते बघून आम्ही घुमट दरवाज्याच्या दुसऱ्या बाजूला असलेला रंगीन महाल बघायला गेलो. १० - १२ पायऱ्या चढून गेल्यावर थोडी मोकळी जागा आहे ज्यात कारंजी आणि पाणी वाहून जाण्याची व्यवस्था केलेली दिसते. त्याच्या दोन बाजूला लाकडी कोरीवकाम केलेल्या खांबांनी तयार झालेले स्वागतकक्ष आहेत. तेथून आत जाण्यासाठी देखील लाकडी पर्शियन पद्धतीचे नक्षीकाम असलेल्या निळ्या फरशांनी तयार केलेले दरवाजे आहेत. आत असलेल्या दालनांच्या भिंतीवर छतावर देखील अशीच designs आहेत. प्रत्येकावरील नक्षीकाम वेगवेगळे आहे. आत्ताच Blue & Brown हे combination या भग्नावस्थेत सुद्धा इतकं सुंदर दिसतंय तर जेव्हा या महालाची निर्मिती केली गेली तेव्हा ते कित्ती देखणं दिसत असेल... या रंगीबेरंगी फरशांमुळेच या महालाला कदाचित रंगीन महाल म्हणत असावेत.

     बिदरच्या किल्ल्यातील या महत्वाच्या वास्तू बघून आम्ही अश्तूर बघायला गेलो. किल्ल्याच्या पूर्वेला अंदाजे किमी वर हे गाव आहे. या गावात सुद्धा एक बहामनी tombs चं संकुल (कबरींचा समूह) आहे. अहमद पहिला, अल्लाउद्दीन अहमद दुसरा, शमसुद्दीन मुहम्मद, सुलतान हुमायून यांच्या कबरी तेथे आहेत. काही भग्नावस्थेत तर काही अजून शाबूत आहेत. १५व्या शतकात किंवा त्याच्या आसपासच बांधल्या गेल्या असाव्यात. आजूबाजूला मोठे वृक्ष आहेत त्यामुळे शांत, हिरवागार परिसर आहे. आम्ही डिसेंबर मध्ये गेल्यामुळे हवा पण छान होती एकदम !

     तेथून पाच मिनिटांवर एक चौखंडी नामक स्मारक आहे. ही एक दुमजली अष्टकोनी अशी दुर्मिळ वास्तू आहे. चौखंडीच्या आधी एक प्रवेशद्वार देखील आहे. चौखंडी ही राजपुत्र अहमद शाह आणि अल्लाउद्दीन यांचा अधिपती हजरत खलील उल्लाह याची कबर आहे.

     हे सगळं बघून पुन्हा बिदरला येईपर्यंत - .३० वाजले. पोटात कावळे ओरडायला लागले होते त्यामुळे आधी पेटपूजा केली आणि मग महमूद गवान मदरसा बघायला गेलो. १४७२ मध्ये बहामनी साम्राज्याच्या मुहम्मद शाह याच्या महमूद गवान या मंत्र्याने हा मदरसा बांधला. हे एक निवासी विद्यापीठ होते. यात विद्यार्थ्यांना राहण्यासाठी खोल्या, वाचनालय, अभ्यासवर्ग, मशिद, प्राध्यापकांचे निवासस्थान .चा समावेश होता. याच्या एका बाजूला एक मिनार आहे. संपूर्ण वास्तू ही लाल दगडात बांधलेली असून मिनारावर मात्र हिरव्या, पिवळ्या, निळ्या, पांढऱ्या अशा रंगीबेरंगी फरशांनी नक्षीकाम केलेले आहे.

     तेथून आम्ही पापनाश शिव मंदिरात गेलो. स्थानिक लोकांच्या मते या मंदिरातील शिवलिंगाची स्थापना (प्रतिष्ठापना) भगवान श्रीरामांनी लंकेहून परतीच्या प्रवासात केली. दरीत वसल्यामुळे याच्या आजूबाजूला नयनरम्य परिसर आहे. मंदिराच्या समोरच्या तलावामध्ये नैसर्गिक झरा वाहत येतो - त्याला पापनाश म्हणतात; म्हणून मंदिराचे नाव देखील तेच आहे.

     नंतर आम्ही नरसिंह झरा मंदिर बघायला गेलो. नरसिंहाने सर्वप्रथम हिरण्यकश्यपूला मारले त्यानंतर जलसुरा या राक्षसाची हत्या करण्यासाठी तो रवाना झाला. जलसुरा हा शंकराचा कट्टर भक्त होता. नरसिंहाकडून हत्या झाल्यावर त्याचे पाण्यात रूपांतर झाले नंतर तो नरसिंहाच्या पायाखालून वाहू लागला. मंदिराची ही पौराणिक बाजू असली तरी या मंदिराशी निगडित अजून एक interesting गोष्ट देखील आहे. गाभाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी ३०० मी. लांब पल्ल्याच्या गुहेतून, छातीपर्यंत असलेल्या पाण्यातून जावे लागते. हे पाणी crystal clear नाहीये कारण ते सतत वाहत असतं आणि भाविकांची ये - जा चालू असते. असं म्हणतात की या पाण्यात सल्फरचं प्रमाण जास्त आहे; ज्या लोकांना skin problem आहेत त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहे. नुसतं पाणीच नाही तर गुहेच्या छतावर लटकलेल्या वटवाघूळ आणि घुबडांच्या साथीने हा रोमांचक अनुभव घेता येतो. पण त्यांच्यापासून आपल्याला कुठलाही धोका पोहचत नाही. १९९९ मध्ये श्री. एम. महेश्वर राव या तरुण IAS Officer च्या पुढाकाराने ही गुहा वातानुकूलित करून दिव्यांची देखील व्यवस्था करण्यात आली.

     ही दोन्ही मंदिरे बाहेरूनच बघून आम्ही पुन्हा Barid Shahi Garden कडे निघालो. वाटेत दक्षिण भारतीय स्पेशल कापीचा आस्वाद घेतला. अजून - ठिकाणं बघायची बाकी होती त्यामुळे याची अत्यंत गरज होती.

     Barid Shahi Garden च्या विरुद्ध बाजूला सुद्धा एक समाधी संकुल आहे. त्याला एक प्रवेशद्वार असून ते दुमजली आहे. त्यावर कोरीवकाम केलेले असून तेथे एक नक्षीकाम केलेला छज्जा देखील आहे. जागा विस्तीर्ण आहे पण Barid Shahi Garden इतकी well maintained नाहीये. मात्र आत या संकुलात दोन अतिशय सुंदर समाध्या आहेत. एक आहे अली बारिद शाहाची आणि दुसरी आहे इब्राहिम बारिद शाहाची.

     खरेदीशिवाय कुठलीही trip अपूर्णच असते त्यामुळे आज दिवसाचा शेवट आम्ही खरेदीने करणार होतो. बिदरी कारीगिरी ही बिदरची खासियत आहे. जस्त, तांबे आणि चांदी या धातूंपासून वस्तू तयार केल्या जातात. मूळची पर्शियन असलेली ही कला चौदाव्या शतकात बहामनी साम्राज्यात बिदरमध्ये विकसित केली गेली. या वस्तू "A magic in Black & Silver" या नावाने ओळखल्या जातात. (unfortunately माझ्याकडे बिदरी कारीगिरीचा एक पण फोटो नाहीये पण अधिक सखोल माहिती (फोटोसकट) हवी असल्यास इंटरनेटवर उपलब्ध आहे.) दागिने, छोट्या वस्तू . गोष्टी आम्ही खरेदी केल्या तरीही मला अजून मनासारखं काही मिळालं नव्हतं. (स्त्रीमन - दुसरं काय...!) म्हणून आम्ही बाजारात अजून एक चक्कर मारायचं ठरवलं. तरीही काही वेगळं मिळालं नाही म्हणून आम्ही पुन्हा त्या पहिल्याच दुकानात गेलो तर तो दुकानदार चक्क दुकान बंद करून गायब झालेला होता. तसंच खिन्न मनाने आम्ही (मी जास्त) हॉटेलकडे निघालो. आमच्या हॉटेलजवळ एक नवीन मॉल नुकताच सुरू झाला होता. बिदरी वर्क सोडून बाकी सगळं तेथे होतं. नाही म्हणायला मला एक छानशी साडी मिळाली - कर्नाटकी स्पेशल. मूड ठीक व्हायला तेवढं पुरेसं होतं. आम्ही तेथून बाहेर पडणार तोच तो दुकानदार त्याच्या बायकोला घेऊन त्या मॉलमध्ये आला. आमच्या मनासारखी (खरंतर माझ्या) खरेदी झाली नसली तरी त्याची मात्र छान विक्री झाली होती त्यामुळे तो खुशीने celebrate करत होता.

     त्याच्याच आनंदात आम्ही आमचा आनंद मानत, दिवसभराच्या ठिकाणांची उजळणी करत जेवायला गेलो आणि मग हॉटेलला...!


२७ डिसेंबर २०१३, शुक्रवार

     आजचा आमचा परतीचा दिवस होता पण गाडी संध्याकाळची असल्याने हातात बराच वेळ होता.

     सकाळी .३० च्या आसपास आम्ही बिदरहून निघालो आणि १०.३० - ११  ला गुलबर्ग्याला पोहोचलो. तेथे सगळ्यात पहिले कलबुरगी किल्ला बघायला गेलो. १३४७ मध्ये जेव्हा अल्लाउद्दीन बहामनी हा दिल्ली साम्राज्यापासून वेगळा झाला तेव्हा त्याने या किल्ल्याचे नूतनीकरण तर केलेच पण त्याचबरोबर या किल्ल्यातील मशिदी, महाल समाध्या आणि इतर वास्तू बांधल्या. १३६७ मध्ये तेथील जामी मशिद बांधली. बिदरप्रमाणे या सगळ्या वास्तू देखील भग्नावस्थेतच आहेत. याच किल्ल्यावर जगातील सर्वात मोठी (probably) तोफ आहे. ती बारा गाझी तोफ या नावाने ओळखली जाते. तिची लांबी जवळपास २९ फूट तर घेर . फूट आहे. (आख्खी तोफ फोटोत मावली पण नाही.)

     तेथून आम्ही निघालो आणि वाटेत जेवण करून हाफ्त गुम्बज (घुमट) बघायला गेलो. हे समाधी संकुल सुद्धा १४ - १५ व्या शतकातच बांधलेलं आहे. इंडो - इस्लामिक वास्तू शैलीत बांधलेले एकूण सात घुमट (tombs) या संकुलात आहेत.

     नंतर चोर (शोर) गुम्बज बघीतले. त्या काळात कदाचित याचा वापर watch tower म्हणून केला जात असावा. त्याचबरोबर हजरत शेख सिराजुद्दीन जुनैदी यांचा दर्गा बघीतला आणि स्टेशनकडे जायला निघालो.

     बरोबर संध्याकाळी .५५ ला 'सिकंदराबाद पुणे शताब्दी' मध्ये बसलो आणि बिदरच्या सुंदर आठवणी मनात साठवून आम्ही परतीचा प्रवास सुरू केला.


तळटीप : कृपया comment लिहिताना नावासकट लिहावी.

"बहामनी बिदर..."

     २८ ऑक्टोबर २०१३ , माझ्या आणि बाबाच्या फोटो प्रदर्शनाला आमचे एक family friend जितेंद्र पावगी काका आले होते . प्रदर्शन बघू...