Thursday, 29 April 2021

"दिलवालो की दिल्ली से, आशिको के आग्रा तक..."

     ''दिलवालों की दिल्ली से, आशिको के आग्रा तक'' या शीर्षकाचा आणि माझ्या या travel blog चा प्रत्यक्ष संबंध नसला तरी पहिलाच प्रयत्न वाया जाऊ नये म्हणून केलेला फक्त एक उपाय आहे. अशा या नावातून प्रवासाची जागा फक्त कळावी; हा एक उद्देश देखील आहे.

      गोष्ट आहे ऑगस्ट २०११ ची. 'या वर्षी दिवाळीत कुठली टूर करायची... ?' हा प्रश्नच असा आहे की ज्यावरून वादावादी होणार हे निश्चित ! पण आमचं थोडक्यावरच निभावलं आणि दिल्ली - आग्र्याच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. ठिकाण ठरलं असलं तरी कसं जायचं यावरून वाद झालेच. शेवटी आईच्या मताप्रमाणे जाताना रेल्वे आणि माझ्या मताप्रमाणे येताना विमान; यावर तिघांचं एकमत झालं. (बाबाच्या म्हणण्यानुसार बालहट्ट स्त्रीहट्ट हा ऐकलाच पाहिजे म्हणून त्याने होकार दिला...)

    दुसऱ्याच दिवशी सकाळी सकाळी मी आणि आई रेल्वे बुकिंग करायला गेलो. भली मोठी लाईन होती. बुकिंगच्या खिडक्या होत्या पण ज्यातल्या चालू फक्त होत्या (ये सिस्टिम नाम की भी कोई चीज होती है यार...!) timepass करता करता शेवटी आला एकदाचा आमचा नंबर. सगळे details दिल्यावर त्या ऑफिसरने tickets आमच्या हातात दिली. ती घेऊन घरी आलो तोच बाबाने १७६० प्रश्नांचा मारा केला. एकाखाली एक असे बर्थ मिळाले नसल्यामुळे दुपारी पुन्हा एकदा आमची वारी रेल्वे बुकिंगच्या ऑफिसमध्ये ! भली मोठी लाईन आमचं आनंदाने स्वागत करायला हजर होतीच... आम्हीही त्यात सामील झालो. आमचा नंबर आला. त्या ऑफिसरला आमचा problem सांगितला तर तो म्हंटला की अशी तिकिटं तुम्हाला कधीच मिळणार नाहीत कारण संपूर्ण भारतातून एकाच वेळी booking होत असतं; त्यामुळे ही तिकिटं अशीच ठेवा आणि आयत्यावेळी रेल्वेतच adjust करा. बाबाशी फोनवर सगळी परिस्थिती बोलून आणि दुसरा पर्यायच नसल्यामुळे आम्ही तीच तिकिटं घेऊन घरी परतलो. पण निदान आता आमचं . ११. ११ चं रेल्वेचं तिकीट confirm तरी होतं.

      पण येतानाचं तिकीट अजून बाकी होतं. माझा बालहट्ट (प्रत्येक मूल हे आई वडीलांसाठी लहानच असतं ना...!), काळानुसार बदलाव आणि नवीन सोयीसुविधांचा वापर करायलाच हवा म्हणून विमानाचं तिकीट internet वरून काढायचं ठरवलं पण एकदाच येणं अपेक्षित असलेला OTP - वेळा आला आणि कार्डच block झालं. Phones, E-mails असे सगळे सोपस्कार झाले. साईटवरून airport चा नंबर घेतला. फोन लावला तर "हॅलो, श्रीलंकन एअरवेज" असं म्हणत एका officer ने तो उचलला. पण सुदैवाने आम्हाला हव्या असलेल्या Indigo Airlines चे तीनही फोन नंबर त्याने दिले. (ते चालू आहेत की नाही हा प्रश्न होताच !) पण पहिल्याच नंबरला उत्तर मिळालं. त्या officer ने पुन्हा प्रयत्न करण्याचा (एक फुकट) सल्ला दिला. तोच सल्ला आमलात आणण्याच्या प्रयत्नात आख्खा दिवस वाया गेला. दुसऱ्या दिवशी office मध्ये परत फोन केला आणि विचारलं की airport ला येऊनच पैसे भरू का? Officer ने संमती दर्शवताच आम्ही पैसे भरून आलो आणि आमचं येतानाचं तिकीट देखील confirm झालं. १०. ११. ११ रोजी, दुपारी .३० वाजता, दिल्ली ते पुणे...

      Photographic Journey असल्यामुळे दिल्ली - आग्रा आणि त्याच्या जवळच्याच मथुरा, भरतपूर, फतेहपूर सिक्री या सर्व ठिकाणच्या जागा निश्चित केल्या. जास्त करून जुन्या, ऐतिहासिक वास्तूच ! एक itinerary बनवली. तसेच श्री. आठवले यांना देखील भेटलो. ते इतिहासाचे अभ्यासक आहेत. त्यांनी आमच्या list मधील सगळ्याच वास्तूंबद्दल सविस्तर माहिती दिली, ज्याचा उपयोग प्रत्यक्ष ती वास्तू बघताना आम्हाला होणार होता...

       नोव्हेंबरला सकाळी ११. १० ची गाडी होती. पुणे ते हजरत निजामुद्दीन दुरांतो एक्प्रेस. कपडे धुणं, विंग्स कॅबने (वेळेत) स्टेशनला जाणं आणि या सगळ्यात होणारे वाद हे सगळं करून आम्ही वेळेत स्टेशनला पोहोचलो १०.५० लाच गाडीत चढलो. एक नंबरच्या प्लॅटफॉर्मवर गाडी येणार असल्यामुळे जास्त धावपळ झाली नाही. सीट बर्थची adjustment करून झाली एकदाची प्रवासाला सुरुवात ! गाडी पूर्ण A.C. आणि स्वच्छताही वाखाणण्याजोगी होती. खाण्यापिण्याची पण चंगळच होती. एक झालं की एक चालूच होते. पुण्यातल्या एका शाळेतील मुलांचा ग्रुप आमच्या डब्यात होता. त्यांची बडबड, मजामस्ती बघण्यात, गाणी ऐकत, खातपीत हा १८ तासांचा प्रवास कसा संपला ते समजलंच नाही. मध्येच कधीतरी बाहेरचं दृश्य बघताना मला चक्क 'सचिन' नावाचं एक स्टेशन दिसलं. असाच सगळा time pass करता करता झोपून गेलो. जाग आली ती एकदम सकाळी वाजताच. खरंतर झोपतानाचा गाडीचा speed लक्षात घेता नक्की गाडीला उशीर होणार असंच वाटत होतं पण अहो आश्चर्यम ! गाडी चक्क अर्धा तास लवकर पोहोचली होती. (हा अनुभव मी नंतरच्या काही प्रवासात देखील घेतला आहे.)

      स्टेशनवर आनंद नावाचा ड्राईव्हर आम्हाला न्यायला आला. Sunstar Heights नावाच्या हॉटेलमध्ये आमचं बुकिंग होतं. पण तिथल्या खोल्या लहान असल्यामुळे आम्हाला Sunstar Residency मध्ये shift करण्यात आलं. सकाळी .३० लाच हॉटेलला पोहोचल्यामुळे सगळं आवरून, ब्रेकफास्ट करून १० च्या सुमारास sightseeing करण्यासाठी बाहेर पडलो.


०२ नोव्हेंबर २०११, बुधवार

     Itinerary बरोबर असल्यामुळे दिवसाला - ठिकाणं आम्ही बघायची ठरवली होती. साधारण एकाच रस्त्यावर असलेली ठिकाणं आणि photography लाही योग्य तेवढा वेळ मिळावा यासाठीचाच हा खटाटोप होता.

      आज सर्वप्रथम बघीतलं ते इंडिया गेट. युद्धात (अंदाजे १९१४ ते १९२१ सालात) धारातीर्थी पडलेल्या जवानांचे स्मारक. अनेक जवान, अधिकारी यांची नावे त्यावर कोरलेली आहेत. अनुक्रमे वायुसेना, जलसेना आणि थलसेना (Indian Air Force, Navy and Army) यांचे झेंडे देखील लावलेले आहेत. तसेच तिथे एक ज्योत - 'अमर जवान ज्योत' ; अखंड तेवत असते.

      त्यानंतरचं आमचं ठिकाण होतं - लोटस टेम्पल. पण वाटेत एक इस्कॉन मंदिर दिसलं आणि आम्ही लगेच photo stop घेतला... तिथला प्रसाद घ्यायलाही विसरलो नाही. (असे अचानक येणारे photo stop खूप असतात आमच्या प्रत्येक ट्रीपमध्ये.) लोटस टेम्पल हे बहाई समाजाचं मंदिर - प्रार्थनास्थळ आहे. प्रशस्त आणि खूप स्वच्छ ! त्यांच्या meditation hall मध्ये गेलो; अत्यंत गर्दी होती पण एकदम pin drop silence. याची रचना कमळावरून (Lotus Flower) प्रेरणा घेऊन केलेली आहे.

      त्यानंतर आणि आजच्या दिवसातलं आमचं शेवटचं ठिकाण होतं; अक्षरधाम मंदिर ! उशीर झाल्यामुळे lunch सुद्धा तिथेच करायचं ठरवलं आम्ही. पण तिथे आतमध्ये काहीही न्यायला परवानगी नव्हती. त्यामुळे माझा आणि बाबाचा कॅमेरा (जो आम्हाला आमच्या जीवाइतकाच प्रिय आहे.), मोबाईल, इतर सर्व मौल्यवान गोष्टी गाडीत ठेऊनच आम्ही निघालो. आमचा ड्राईव्हर हे सगळं घेऊन पळाला तर...? अशी अनामिक भीती मनात घेऊन, त्याच्यावर विश्वास टाकत आम्ही आत गेलो. पण तिथली सुरक्षाव्यवस्था पार करता करता अजूनच उशीर झाला ! सगळे सोपस्कार पार पाडून पहिले पेटपूजा केली.

      २०० रु. च्या तिकिटात कार्यक्रम असतात. (आता कदाचित काही बदल झाले असतील.) आम्ही एकच बघू म्हणता म्हणता तीन बघीतले. सर्वप्रथम बघीतला तो बालयोगी नीलकंठ यांच्यावरील लघुपट. एका भव्य सभागृहात तो दाखवला जातो. नीलकंठ यांनी बालवयात १२,००० कि. मी. ची भारत पदयात्रा केली होती. निसर्ग आणि १७०० च्या काळातील भारताचे मनोहारी दृश्य त्यांनी पडद्यावर साकारले आहे. अंदाजे ३० - ४० मिनिटांची ती फिल्म आहे. नंतर आम्ही 'संस्कृती विहार - नौका विहार' करायला गेलो. यात प्राचीन भारतीय संस्कृतीचे दर्शन आपल्याला घडते. तक्षशीला विद्यापीठ, आयुर्वेद, सुश्रुत - नागार्जून - आर्यभट्ट - कणाद हे विद्वान तसेच वाल्मिकी - व्यास यांसारखे ऋषी, ज्ञानेश्वर - तुकाराम - मीराबाई - गुरुनानक इत्यादी संत या सर्वांचा काळ दाखवण्यात आला आहे. त्यानंतर अजिंठा - वेरूळ लेण्यांची (गुहांची) निर्मिती हा विभाग येतो. एकदम पैसा वसूल असा ! ते बघून आपण त्या काळात जातो. तिथलं वातावरण बघूनच (actually अनुभवून) आपल्याला असं वाटतं की आपणही त्या शेकडो (आणि अज्ञात) कलाकारांमध्ये सामील व्हावं ज्यांनी या अद्भूत वास्तूची निर्मिती केली आहे. शब्दच नाहीयेत त्यांचं वर्णन करायला. पंधराच मिनिटांच्या या बोट राईडने (आपण एका बोटीत असतो आणि ती बोट एका बोगद्यातून जाते. बोटीसाठी छोटासा पाण्याचा प्रवाह आणि दोन्ही बाजूला किनाऱ्यावर या सगळ्या गोष्टी घडत असतात.) अनेक संस्कृती, काळ आणि महान व्यक्तिमत्त्वांचे जीवन आमच्यासमोर उभे केले.

      नंतरचा प्रोग्रॅम होता संगीतमय कारंजे... Musical Fountain (actually त्यात lights पण होते.) ही सर्व कारंजी भारतीय प्रकारच्या कुंडांमध्ये बसवलेली आहेत. त्यात मानवी जीवनाच्या जन्म, बालपण, कौमार्य, तारुण्य, विवाह, वृद्धत्व आणि मृत्यू या अवस्था कारंज्यांद्वारे आपल्या समोर मांडल्या जातात. जन्म ते वृद्धत्व या अवस्था शंख - विष्णूच्या वाद्यातून तर मृत्यू ही अवस्था डमरू - शंकराच्या वाद्यातून मांडल्या आहेत. खूप सुंदर असा हा नजारा असतो. या वास्तूमधील चौथी गोष्ट होती ती म्हणजे खुद्द अक्षरधाम मंदिर ! श्री स्वामीनारायण यांचं मंदिर. पण इतर कार्यक्रम बघता बघताच रात्रीचे वाजले होते त्यामुळे ते मंदिर बघताच आम्ही पार्किंगच्या दिशेने निघालो.

      आमच्या सर्व वस्तू आणि ड्राईव्हर सकट गाडी योग्य ठिकाणी उभी होती. हॉटेलला परत जायला निघालो तोच अचानक अजून एक plan ठरला... दिल्ली मेट्रोचा ! पुढे वेळ मिळाला नाही तर मेट्रोस्वारी राहून जाईल म्हणून लगेच आम्ही तयार झालो. ड्राईव्हरने सांगितल्याप्रमाणे स्टेशनचा प्रवास करून, पुन्हा आमच्या गाडीने हॉटेलकडे जायला निघालो. दिल्लीच्या महाभयंकर traffic मधून वाट काढत पोहोचलो एकदाचे. दिवसाची सांगता हॉटेलवर जेवण आणि कोटी जिंकलेला सुशीलकुमार KBC मध्ये बघता बघता केली.

(अक्षरधाम मंदिराचे संदर्भ हे मी आठवून आणि त्या ट्रिपमध्ये काढलेल्या notes वरून लिहिले आहेत. कदाचित आजच्या घडीला त्यात काही बदल देखील झाले असतील.)




०३ नोव्हेंबर २०११, गुरुवार

     सगळं आवरून सकाळी - .३० च्या सुमारास आम्ही बाहेर पडलो. पहिलं ठिकाण होतं - दिल्लीचा लाल किल्ला. जुन्या दिल्लीत वसलेला हा किल्ला मुघल सम्राटांचा मुख्य निवास होता. १६४० च्या दशकात बांधलेला. लाल रंगाच्या वाळूच्या खडकापासून (sandstone) बांधला असल्यामुळे त्याला लाल किला असं नाव पडलं. तसंच लाल हा शब्द हिंदुस्थानी असून किला हा शब्द पर्शियन आहे. शाही कुटूंब राहत असल्यामुळे याचं मूळ नाव किला - - मुबारक असं होतं.

      १५ ऑगस्ट १९४७, भारताच्या पहिल्या पंतप्रधानांनी याच किल्ल्याच्या लाहोरी दरवाज्यावर भारतीय तिरंगा उंचावला होता. आजही दरवर्षी १५ ऑगस्टला भारतीय पंतप्रधान याच ठिकाणी झेंडावंदन करून भाषण करतात.

      या किल्ल्यातील लाहोर दरवाजा, दिल्ली दरवाजा, दिवान - - आम, दिवान - - खास, रंगमहाल, मोती मस्जिद, हमामघर इत्यादी गोष्टी बघीतल्या. एकेकाळी माणसांनी, वस्तूंनी, झाडाझुडूपांनी गजबजलेली ही वास्तू आज जरी उजाड असली तरी तिची भव्यता आपल्या डोळ्यात भरते. जवळजवळ प्रत्येक भिंतीवर असलेलं कोरीवकाम, वास्तूची रचना, हवा - पाणी - उजेड यांचा विचार करून केलेली इमारत बांधणी बघून आश्चर्य वाटतं. इतकं perfection / dedication कुठून  आलं असा प्रश्न देखील पडतो. (या सर्व गोष्टी आजपर्यंत बघीतलेल्या प्रत्येक वास्तू बघताना माझ्या मनात येतात.)

      आजच्या दिवसातली दुसरी गोष्ट होती राजघाट. महात्मा गांधी यांचं स्मारक. वेळेच्या अभावी आम्ही फक्त तेवढंच बघून निघालो. तिथे इतरही स्मारक आहेत. तिथेच जवळपास जेवण करून पुराना किला बघायला गेलो. पुराना किला - जो शेरगढ़ नावाने देखील ओळखला जायचा - हा दिल्लीच्या सर्वात जुन्या किल्ल्यांपैकी एक आहे. हुमायूनच्या काळात याची बांधणी सुरू झाली होती जी शेरशाह सूरीच्या काळात देखील चालू राहिली. पश्चिमेच्या बड्या दरवाज्यातून आत जायला रस्ता आहे. जागा खूप मोठी आहे पण आत फारशा गोष्टी नाहीयेत. एक आहे ती म्हणजे किला - - कुहना मस्जिद (Qila - i - Kuhna Mosque) जी शेरशाह सूरीने हुमायूनला पराभूत करून पुराना किला स्वतःच्या ताब्यात घेतल्यावर स्वतःच्या खाजगी वापरासाठी बांधली होती. दुसरी वास्तू आहे ती म्हणजे शेरमंडल. काहींच्या मते याची बांधणी सुद्धा शेरशाह सूरीनेच केली होती पण बहुतांश लोंकांच्या मते शेरमंडल हे हुमायूनचे खाजगी वाचनालय होते आणि त्याच्याच दुसऱ्या मजल्याच्या बाल्कनीतून खाली पडून हुमायूनचा मृत्यू झाला होता. या दोनच गोष्टी आता चांगल्या अवस्थेत आहेत. उत्तरेकडील तलाकी दरवाजा (त्याचे अवशेष) देखील बघीतला.

      आजच्या दिवसातील शेवटचं ठिकाण होतं Humayun's Tomb - हुमायूनची समाधी - Maqbara - i - Humayun. ही समाधी मुघल सम्राट हुमायूनची पहिली पत्नी बेगा बेगम (हाजी बेगम) हीच्या देखरेखीखाली बांधली गेली. तिने निवडलेल्या खास पर्शियन आर्किटेक्टसनी  ती बांधली; १५५८ मध्ये (ताजमहाल च्या देखील आधी.) भारतातील पहिला garden tomb, तसेच लाल वाळूच्या खडकाचा वापर (Red sand stone) देखील इतक्या मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदाच झाला. Humayun Tomb माझ्या सगळ्यात आवडत्या वास्तूंपैकी एक आहे. तिथेच सूर्यास्त बघीतला आणि मग हॉटेलला परत गेलो.






०४ नोव्हेंबर २०११, शुक्रवार

     वर्षातून एकदा होणारी आमची सहल ही सहसा १०-१२ दिवसांचीच असते. एखादं मुख्य ठिकाण ठरवून त्याच्या आजूबाजूची ठिकाणं बघायची. यातही दिल्ली - आग्रा ही मुख्य ठिकाणं होती पण त्याच्याच जवळची मथुरा, फतेहपूर सिक्री आणि भरतपूर (राजस्थान) ही ठिकाणं देखील आम्ही बघायची ठरवली. पुन्हा त्याच ठिकाणी जाणं होणार नसतं आणि वेळ, पैसा देखील महत्वाचा असतो म्हणून मग असं planning आम्ही करतो.

      सकाळी वाजताच मथुरेला जायला निघालो पण ट्रॅफिक पार करता करता दुपारचे १२ वाजले पोहोचायला. वाटेतच जेवण करून आधी वृंदावनला गेलो. श्रीकृष्ण ११ वर्षांपर्यंत तिथे राहायला होते. तिथे त्यांचं घर (मंदिराश्रम), गोविंद देव मंदिर, यमुना नदीवरचे घाट बघीतले. त्या दिवशी नवमी होती. त्यांचा शुभदिवस. " आज जर का मंदिरात दर्शन घेतलं तर सगळी पापं धुतली जातात..." असं प्रत्येकजण सांगत होता आम्हाला. तसंच त्यादिवशी शुभ दिवस असल्याने कसलासा उत्सव पण साजरा होत होता. वृंदावनातील सर्व मंदिरांना प्रदक्षिणा घालायची असते; त्यामुळे कोपऱ्या कोपऱ्यावर गर्दी होती. ती गर्दी टाळून, दर्शन घेताच आम्ही कृष्ण जन्मभूमी आणि गोकुळ बघायला गेलो. तिथे सुद्धा तोच प्रकार - उत्सवासाठी मंदिरांना प्रदक्षिणा घालण्याचा ! त्यामुळे सायकल रिक्षाने एक चक्कर मारली आणि एका टपरीवर चहा प्यायला थांबलो. अतिशय छोटासा असा बोळ (गल्ली) होता, दोन्ही बाजूला त्याच्या गटारं होती आणि तिथेच चहाचे ठेले ! आम्ही कधीही मडक्यात (कुल्लड) चहा प्यायला नसेल म्हणून त्या चहावाल्याने आम्हाला मडक्यात चहा दिला. तो प्यायला आणि मग गोकुळातले घाट बघायला गेलो. थोडावेळ थांबून हॉटेलवर जायला निघालो. दिवसभर मनात एक विचार राहून राहून येतच होता की एवढी पवित्र जागा असून सुद्धा इतकी अस्वच्छ कशी काय...?



०५ नोव्हेंबर २०११, शनिवार

     कालच्या दिवसातलं sightseeing लवकर संपल्यामुळे जरा आराम पण करता आला. आज सकाळी .३० ला बाहेर पडलो. नाश्ता करून वाटेतच असलेलं जय गुरुदेव यांचं पांढऱ्या संगमरवरातील मंदिर बघीतलं. Photo stop घेऊन गोवर्धन मार्गे डीगला जायला निघालो. डीग हे भरतपूर, राजस्थान येथे आहे. इंटरनेट वरून आधीच सगळी माहिती गोळा केलेली असल्यामुळे सगळं सोपं जाईल असं वाटत होतं. त्यानुसार किल्ला बघायला गेलो पण आमच्या जवळच्या माहितीतील एकही गोष्ट तिथे दिसली नाही. तटबंदी शाबूत असलेला उजाड किल्ला ! चहा ब्रेकमध्ये स्थानिक लोकांकडे चौकशी केल्यावर समजलं की आम्हाला हवी असलेली वास्तू आहे 'जल महाल'. याच्या दोन बाजू पाण्यात असल्यामुळे याला जल महाल म्हणतात. महाराजा बदन सिंग च्या काळातील भरतपूर संस्थानाची राजधानी डीग होती आणि हा त्यांचा summer palace (खास उन्हाळ्यासाठी) होता. नंतर सूरजमलने राजधानी भरतपूरला बसवली आणि डीग दुसरी राजधानी झाली. हा जल महाल १७७२ मध्ये बांधला असून जवळजवळ १९७० पर्यंत वापरात होता. या जाट शासकांनी मुघल चारबाघ वरून प्रेरणा घेऊन हा महाल बांधला आहे. झाडं, फुलांचे ताटवे (flower beds), walkways तसंच गोपाल सागर आणि रूप सागर हे दोन मोठे तलाव, कारंजी या सर्व सुविधांनी परिपूर्ण असा हा महाल आहे. गाव तसं छोटं आहे परंतू किल्ल्याची तटबंदी, हा जल महाल या जागा प्रशस्त आणि स्वच्छ आहेत.

      पुढचं ठिकाण होतं भरतपूर. जेवण करून भरतपूरचा किल्ला - लोहगड बघायला गेलो. तटबंदी अजूनही शाबूत आहे. परिसर खूप मोठा असल्यामुळे आता त्या किल्ल्यात शाळा, कॉलेजेस घरे देखील मोठ्या प्रमाणात आहेत. त्याच किल्ल्यात महाराजा सूरजमलने बांधलेल्या एका प्रशस्त महालात सरकारी संग्रहालय आहे. ज्यामध्ये भरतपूर संस्थानाच्या - राज घराण्याच्या वस्तू, शस्त्रं, कपडे, चित्रं, शिल्पं इत्यादी गोष्टी मांडल्या आहेत. मोठी मोठी स्वयंपाकाची भांडी देखील आहेत. तसंच एक पर्शियन पद्धतीचा हमाम सुद्धा आहे. संग्रहालयाच्या जवळच्या किल्ल्याच्या तटबंदीवरील एका बुरूजावर गेलो. जवाहर बुर्ज. तिथे छोटे छोटे मंडप (pavilionआहेत, जिथून भरतपूरचा खूप छान नजारा दिसतो.

      तिथून मग आम्ही भरतपूरचे 'केवलादेव पक्षी अभयारण्य' बघायला गेलो. सूर्यास्ताची वेळ असल्यामुळे आणि पुरेसे फोटोग्राफीचे साहित्य नसल्यामुळे नुसतेच नेत्रसुख घेऊन त्याच्याच जवळच्या एका resort मध्ये आम्ही प्रस्थान केले.

 



०६ नोव्हेंबर २०११, रविवार

     आजचा आमचा plan होता - भरतपूर ते आग्रा व्हाया फतेहपूर सिक्री. १५६९ ला बसवलेली मुघल सम्राट अकबराची राजधानी. मुस्लिम वास्तूकलेचा एक अतिशय उत्तम नमुना पण पाण्याच्या दुर्भिक्षामुळे ती पुन्हा आग्र्याला बसवावी लागली.

      यातील एक मुख्य वास्तू आहे बुलंद दरवाजा (Door Of Victory). सम्राट अकबराने १६०२ मध्ये आपल्या गुजरात विजयाचे स्मारक म्हणून बांधलेला आहे. जमिनीपासून ५० मीटर उंच असलेला हा दरवाजा फतेहपूर सिक्रीमधील सर्वोच्च इमारत आहे. हा दरवाजाच जामा मशिदीचं मुख्य प्रवेशद्वार आहे. जामा मस्जिद, सलीम चिश्ती दर्गा, दिवान - - आम, दिवान - - खास, पंचमहाल, अनुप तलाव, जोधाबाईचा महाल, बिरबलाचे घर, हिरण मिनार इत्यादी वास्तू बघीतल्या. अत्यंत प्रशस्त आणि जवळपास सर्वच लाल वाळूच्या खडकात बांधलेल्या आहेत.तत्कालीन भारतातील हिंदू आणि मुस्लिम स्थापत्य कलेचा प्रभाव प्रामुख्याने फतेहपूर सिक्रीमधील सर्व वास्तूंवर पडलेला दिसतो. (या सर्व वास्तू बघताना 'जोधा अकबर' चित्रपटातील अनेक प्रसंग आठवले. अत्यंत सुंदररित्या तो सर्व इतिहास आपल्या समोर मांडलेला आहे. ते काल्पनिक आभासी जग इतकं खरं वाटतं की या वास्तू बघताना ते प्रसंग अगदी तसेच घडले असतील असं मला वाटलं.)

      फतेहपूर सिक्रीहून आम्ही आग्र्याला जायला निघालो. वाटेतच जेवण करून आग्र्याचा लाल किल्ला बघायला गेलो.

      काय आणि किती लिहावं याबद्दल? आज हे लिहिताना वाटतंय की त्या किल्ल्यातलं खूप काही बघायचंच राहून गेलं आहे. आम्ही फक्त काही तास तिथे होतो पण - दिवस तरी त्यासाठी ठेवायला हवे होते. कदाचित पुन्हा जाण्याचा योग येईलही... असो !

      तर आग्र्याचा हा किल्ला बघायची (explore करायची) सुरूवातच झाली शिवाजी महाराजांच्या स्मारकाने ! (फोटो तेवढा काढायचा राहिला... पुन्हा एकदा ही अशी ट्रीप करावी लागणार असं दिसतंय...) एवढ्या मोठ्या या किल्ल्याच्या सुरूवातीलाच शिवाजी महाराजांचे हे स्मारक अत्यंत खंबीरपणे उभे आहे. (शिवराय बादशाहच्या हातावर तुरी देऊन आग्र्याच्या किल्ल्यातून निसटले या शालेय धड्याची आठवण झाली.) अभिमानाने आणि आनंदाने ऊर डोळे भरून आले. त्यांना नमन करून आम्ही किल्ल्यात प्रवेश केला. आज बराचसा भाग हा Indian Army च्या ताब्यात आहे. (जवळपास ७५% असं तेथील लोक सांगत होते.) उरलेला भाग आपल्याला बघता येतो.

      दिल्लीला राजधानी नेण्यापूर्वी १६३८ पर्यंत मुघल सम्राटांचा मुख्य निवास हा याच किल्ल्यात होता. मुघल सम्राट अकबर याच्यासाठी बांधलेला हा किल्ला आहे. लाल वाळूच्या खडकात बांधलेला मुघल स्थापत्य शैलीचा अजून एक उत्कृष्ठ नमुना ! यमुना नदीला समांतर आणि जवळपास ९४ एकर जागेत वसलेला. (हा किल्ला बघताना देखील जोधा अकबर चित्रपटाची आठवण येत होती.) सर्वप्रथम अमर सिंग दरवाजा बघीतला. हा दरवाजा लाहोर दरवाजा म्हणून पण प्रसिद्ध आहे. त्यानंतर जहांगीर महाल - जो खाशा स्त्रियांचा जनाना म्हणून देखील वापरला गेला, हौज - - जहांगीर (एका दगडात बांधलेला आंघोळीचा टब), शाह जहानी महाल - जो लाल वाळूच्या खडकातील जहांगीर महाल आणि पांढऱ्या संगमरवरी खास महालाच्या मध्ये वसलेला आहे, शीश महाल - जो समर पॅलेस  चा एक भाग आहे, अंगूरी बाग, दिवान - - आम, बावली - जी दिवान - - आम समोरचीच पायऱ्यांची विहीर, नगीना मस्जिद इत्यादी गोष्टी बघीतल्या.

      रोज रोज पराठा दही खाऊन कंटाळा आल्यामुळे त्यादिवशी आम्ही चक्क एका उडपी रेस्टॉरंट मध्ये जेवलो आणि हॉटेल कडे निघालो.






०७ नोव्हेंबर २०११, सोमवार

     आज आग्र्याहून दिल्लीला आम्ही परत जाणार होतो. ताज महाल बघीतल्या शिवाय ही ट्रिप पूर्ण कशी होणार होती ? जागतिक सात आश्चर्यांपैकी एक असा ताज महाल ! सकाळी नेहमी पेक्षा लवकर निघून आम्ही तिथे पोहोचलो. त्या दिवशी कुठलीतरी ईद होती त्यामुळे सर्वांना प्रवेश फुकट होता आणि त्या अनुषंगाने वाढणारी गर्दी ही तेवढीच होती. यमुना नदीच्या किनाऱ्यावर वसलेला, १६३२ मध्ये मुघल सम्राट शाहजहान याने आपल्या लाडक्या पत्नीची - मुमताज महलची समाधी (कबर) म्हणून बांधलेला हा ताज महाल आहे. खुद्द शाह जहानची कबर  सुद्धा तिथेच आहे. पांढऱ्या संगमरवरात बांधलेला मुघल स्थापत्य - वास्तू कलेचा अजून एक अत्यंत सुबक आणि देखणा असा नमुना. गर्दीला झेलत, फोटो काढत काढत आम्ही ताज महाल अनुभवला. दरवाजा - - रौझा आणि त्यासमोरील गल्लीमध्ये असणाऱ्या छोट्या छोट्या दुकानात (souvenir shops) थोडी खरेदी करून आम्ही दुपारी जेवायला गेलो. जेवण करून आम्ही पुन्हा एकदा आग्र्याचा लाल किल्ला बघायला गेलो. काल बघायचा राहिलेला भाग आज बघीतला, फोटो काढले आणि दिल्लीला परत जायला निघालो.

 


०८ नोव्हेंबर २०११, मंगळवार

     आज सर्वात पहिले आम्ही लोदी गार्डन्स बघायला गेलो. दिल्लीतील एक सार्वजनिक उद्यान. त्यात लोदी राजवंशाच्या कबरी आहेत. अफगाणिस्तानच्या या राजांनी दिल्लीवर अंदाजे १४५१ ते १५२६ च्या दरम्यान राज्य केलं. आम्ही त्यातल्या मोहम्मद शाह, सिकंदर लोदी यांच्या कबरी तसेच बडा गुम्बद (घुमट), शीश गुम्बद (आरसा - रंगीबेरंगी टाईल वर्क असलेलं घुमट) इत्यादी गोष्टी बघीतल्या. थोडावेळ तिथे थांबून, पार्कमध्ये एक चक्कर मारून मग आम्ही सफदरजंग टोम्ब बघायला गेलो.

      माझ्या आवडीच्या वास्तूंपैकी अजून एक - सफदरजंग टोम्ब (समाधी - कबर). अवधचा नवाब - सफदरजंग याच्यासाठी १७५४ साली बांधलेली वास्तू. लाल वाळूचा दगड आणि संगमरवर यांनी हि समाधी बांधलेली आहे. या ट्रीपमध्ये बघीतलेल्या सर्वच समाध्या (ताज महाल, हुमायून टोम्ब, सफदरजंग टोम्ब) या रचनेने साधारणपणे सारख्याच आहेत. चारही बाजूला बाग (फुलांची झाडं, कारंजी इत्यादी) आणि मधोमध भव्य चौथऱ्यावर बांधलेली समाधी. सर्व बाजूने सारखीच दिसणारी. प्रत्येक कोपरा अन् कोपरा अत्यंत बारीक, सुबक कारागिरीने नटलेला आहे. ज्या बाजूने प्रवेश करावयाचा तिथे एक दुमजली प्रवेशद्वार देखील आहे. तेही तितक्याच सुबकतेने नटलेले.

      आजचा दिवस लवकर सुरू झाल्याने अजून एक ठिकाण बघूनच लंच करूया असं आम्ही ठरवलं. (ट्रिप पण संपत आली होती त्यामुळे जास्तीत जास्त - निदान जे ठरवलं होतं ते तरी बघायचंच होतं.) सफदरजंग टोम्ब नंतर आम्ही कुतुब मिनार बघायला गेलो. दिल्लीच्या मेहरौली भागात एका प्रशस्त जागेत कुतुब मिनार आणि इतर वास्तू आहेत. (Qutub Minar Complex) कुतुब मिनार म्हणजेच विजयस्तंभ (Victory Tower)सुफी संत ख्वाजा कुतबुद्दीन बख्तियार काकी यांच्या नावावरून याला कुतुब मिनार म्हणतात. याची उंची ७२. मीटर असून जगातील सर्वात उंच विटांनी बांधलेला मिनार आहे. त्याच्याच बाजूला कुव्वत - उल - इस्लाम मस्जिद आहे. तुघलक, खिल्जी, ब्रिटिश यांनी त्यांच्या त्यांच्या काळात काही रचना बांधल्या. अलई मिनार, आयर्न मिनार तसेच अल्लाऊद्दीन खिल्जी, इल्तुतमिश, इमान जमीम यांच्या कबरी देखील आहेत. वेगवेगळ्या राजवटीमध्ये बांधल्या गेलेल्या या वास्तू आहेत त्यामुळे त्यांची रचना, दगड - वीटांमधील भिन्नता, इतिहास वेगवेगळा आहे. तसेच काही जाणकारांच्या मते कुव्वत - उल - इस्लाम मस्जिद जुन्या हिंदू आणि जैन मंदिरांचे खांब इतर गोष्टी वापरून बांधलेली आहे त्यामुळे या सर्व complex मध्ये सर्व गोष्टींवर इस्लामिक स्थापत्याचा प्रभाव असला तरी काही गोष्टी हिंदू - जैन स्थापत्य कलेवर आधारित देखील आहेत.

      कुतुब मिनारचा हा सर्व परिसर बघेपर्यंत आणि मनसोक्त फोटो काढेपर्यंत दुपारचे कधी वाजले कळलंच नाही. अजून तुघलकाबादचा किल्ला बघायचा बाकी होता पण आधी पेटपूजा केल्याशिवाय पर्याय नव्हता. तुघलकाबादच्या जवळ पोहोचल्यावर रेस्टॉरंटचा शोध सुरू झाला. पण काहीच मिळेना. अजून उशीर होऊ नये म्हणून शेवटी सामोसा आणि चहा असा बेत केला. खाऊन झाल्यावर किल्ला बघायला गेलो पण तिथे शूटिंग चालू होतं त्यामुळे आत फार जाता येणार नव्हतंच आणि संध्याकाळ पण व्हायला लागली होती त्यामुळे तुघलकाबाद किल्ल्याचं मुखदर्शन घेऊन आम्ही हॉटेलच्या दिशेने निघालो.

 




०९ नोव्हेंबर २०११, बुधवार

     ट्रिपचा शेवटचा दिवस. तसा आरामातच जाणार होता. सगळं आवरून आम्ही राष्ट्रीय आगगाडी संग्रहालय (National Rail Museum) बघायला गेलो. भारतीय रेल्वे वाहतूकीचा इतिहास, जुन्या पण आत्ता वापरात नसलेल्या तरी बघता येतील अशा गाड्या, त्यांची इंजिन्स इत्यादी गोष्टी तिथे आहेत. एक गॅलरी आहे; त्यात सुद्धा फोटो, छोटी रेल्वे मॉडेल्स अशा गोष्टी आहेत. परिसर मोठा असल्यामुळे एक मिनी ट्रेन (चालू स्थितीतील) आहे जी पर्यटकांना रेल्वे म्युझियमची सैर घडवते. त्या ट्रेनची एक round घेऊन, ती गॅलरी बघून आम्ही हॉटेलवर परत आलो. हॉटेलवरच लंच करून थोडा वेळ विश्रांती घेऊन पुन्हा बाहेर पडलो.

      या ट्रीपमधलं आम्ही शेवटचं ठिकाण बघणार होतो - राष्ट्रपती भवन. भारताच्या राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान. ३४० खोल्यांच्या या भवनात रिसेप्शन हॉल्स, गेस्ट रूम्स, ऑफिसेस् आणि एक मुघल गार्डन देखील आहे. क्षेत्रफळाच्या बाबतीत जगातील कोणत्याही राज्यप्रमुखांचे सर्वात मोठे निवासस्थान आहे. तेव्हा श्रीमती प्रतिभाताई पाटील या राष्ट्रपती होत्या. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती. माझा एक काका, श्री. नितीन वाकणकर तिथे राष्ट्रपतींचा सांस्कृतिक सचिव म्हणून काम करतो. त्यामुळे त्याने आधीच ठरवून दिलेल्या वेळेला आम्ही तिथे पोहोचलो. सर्व सुरक्षा व्यवस्था वगैरे पार करून दरबार हॉल बघायला गेलो. तिथल्या अधिकृत फोटोग्राफरने आमचा फोटो देखील काढला. दरबार हॉलच्या स्टेजवर आधी दोन खुर्च्या असायच्या. व्हॉईसरॉय आणि लेडी व्हॉईसरॉय पण आता मात्र एकच खुर्ची असते - राष्ट्रपतींची. त्यानंतर मार्बल म्युझियम आणि एक गॅलरी बघीतली. ज्यात paintings, आजपर्यंतच्या राष्ट्रपतींना मिळालेल्या भेटवस्तू ठेवल्या आहेत. त्यानंतर किचन गॅलरी, त्यातील १०४ लोकांचं बटलर सिस्टीम असलेलं डायनिंग टेबल बघीतलं. त्यातल्या झेंड्यांचा अर्थ असा; लाल म्हणजे जेवण वाढायचा (serving), निळा म्हणजे प्लेट उचलायच्या आणि हिरवा म्हणजे फिरायला परवानगी आहे. तिथे लावलेली मुघल आणि इंग्रजांच्या काळातील हत्यारं देखील आहेत. नंतर अशोका हॉल बघीतला ज्यात सगळे कार्यक्रम होतात. अशोका हॉल, पॅसेज, बँक्वेट हॉल या सगळ्यांच्या खिडकीतून मुघल गार्डन दिसते. सगळ्यात शेवटी . पी. जे. अब्दुल कलाम यांनी जी children's gallery काढली आहे ती बघीतली. बाहेर पडेपर्यंत संध्याकाळ झाली होती. त्यामुळे तिथूनच नितीन काकाच्या घरी जेवायला गेलो आणि मग हॉटेल ला.

 



१० नोव्हेंबर २०११गुरूवार

     आज आमचं परतीचं विमान होतं. दुपारी .३० वाजता. त्यामुळे निवांत आवरून, नाश्ता करून आम्ही १२ च्या सुमारास विमानतळावर पोहोचलो. सगळे सोपस्कार पार करून, गेल्या - १० दिवसांच्या या ऐतिहासिक शहराच्या अनेक आठवणी मनात साठवून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.


तळटीप : कृपया comment लिहिताना नावासकट लिहावी.

13 comments:

  1. Excellent Work Sharvari, all the best for photographic Travel

    ReplyDelete
  2. शर्वरी वर्णन व फोटोग्राफी मस्त.आजचा वेळ त्यामुळे छान गेला.अशीच माहिती लिहीत जा.

    ReplyDelete
  3. Very nice journey made by us during lockdown. Great travel blog and photography. Keep it up.

    ReplyDelete
  4. Excellent travel blog 👍..Beautifully expressed minute detailing... Loved it... God bless you.... M sure many more to come... Keep it up 👍

    ReplyDelete
  5. Excellent. I also traveled with you.Thank u for writing such a blog

    ReplyDelete

"बहामनी बिदर..."

     २८ ऑक्टोबर २०१३ , माझ्या आणि बाबाच्या फोटो प्रदर्शनाला आमचे एक family friend जितेंद्र पावगी काका आले होते . प्रदर्शन बघू...