ऑगस्ट २०१२ मध्ये बाबा त्याच्या मित्रांबरोबर
लेह लडाखची टूर करून आला... तिथे झालेल्या ढगफुटीनंतर अगदी काही दिवसातच. आत्ता एवढं प्रस्त नव्हतं तेव्हा लेह-लडाखचं. ३ इडियटस् मधली आमीर खानची शाळा जिथे आहे तेच लेह-लडाख; एवढंच ज्ञान होतं पण लेहचं दगडी आणि रांगडं सौंदर्य एकदातरी प्रत्येकाने बघावं - खरंतर अनुभवावं असं बाबा वारंवार सांगत होता.
त्यानंतर दोन एक वर्षांनी, २०१२ च्या अखेरी बाबा म्हंटला आपण भूतानला जाऊया. लेह सारखंच तर असेल ते पण... प्रत्यक्षात एकमेव हिमालय (आणि बर्फ) सोडला तर लेह आणि भूतानमध्ये काहीच साम्य नाहीये... पण हे आम्हाला तिथे गेल्यावर समजलं. (इंटरनेटचं अतिक्रमण प्रमाणात होतं तेव्हा.)
परदेशवारी ही कुठल्या ना कुठल्यातरी
travel agency बरोबरच करतो आम्ही
generally कारण शाकाहारी जेवणाचा नेहमी problem येतो; म्हणून मग गिरीकंद ट्रॅव्हलस् आणि प्रसन्न हॉलिडेज् अशा दोन्ही travel agency मध्ये जाऊन चौकशी करून आलो. आमच्या गरजेप्रमाणे itinerary बनवून ते आम्हाला देणार होते. पुण्याहून जायला किंवा यायला
direct flight असेल तरच विमानाने प्रवास करायचा हा आमचा अलिखीत नियम होता - अजूनही आहे. भूतानला जाण्यासाठी त्यांच्याच फक्त airlines आहेत (Bhutan Airlines & Druk Air). तेव्हा फक्त Druk Air च होती. मुंबई - दिल्लीहून
flights आहेत पण त्या आम्हाला नको होत्या. कलकत्त्याहून देखील भूतानला जाता येते - By road or by air. रस्त्याने जायचं म्हणजे वेळच वेळ हवा म्हणून आम्ही
flight ने जायचं ठरवलं. भूतानला ५-६ दिवस आणि कलकत्याला ४-५ दिवस अशी ट्रीप होणार होती. आमच्या या गरजेनुसार दोन्ही agency ने आम्हाला पुढच्या २-३ दिवसात itinerary बनवून दिली. दोन्ही agency चा खर्च साधारण सारखाच येत होता पण तो आमच्या बजेटच्या बाहेर जात होता. म्हणून मग यावेळेस पण आपलं आपणच बुकिंग करूया असं आम्ही ठरवलं. पुणे रे कलकत्ता दुरांतो आणि कलकत्ता ते पारो विमान.
पुणे ते कलकत्ता दुरांतो एक्सप्रेसचं
बुकिंग यावेळेस कुठलीही कटकट न होता झालं. भूतानचं सर्व बुकिंग Bhutan Tourism च्या साईटवरून करता येणार होतं. आमचा एक family friend, धनराज याने सुचवलं की कलकत्त्याला Pride Plaza हे Star Hotel नुकतंच सुरू झालं आहे. तो तेव्हा पुण्याच्या
Pride मध्ये काम करत होता. त्याच्या मदतीने कलकत्त्याच्या राहण्याची सोय झाली. हे सगळं होतानाच दुसरीकडे Bhutan Tourism कडूनही e-mail आला. आमच्या गरजेनुसार त्यांनी
itinerary पाठवली होती. फक्त सगळं pre-book करायचं होतं. पैसे सगळे ऑनलाईन भरायचे होते. (तेवढंच काम जिकरीचं वाटत होतं.) पण दुसरा काही option नसल्यामुळे त्यांच्या सांगण्याप्रमाणे आधी सगळे पैसे भरले आणि आमची ट्रीप confirm झाली. (Star Hotel चं बुकिंग करून सुद्धा आम्ही काढलेला खर्च हा त्या दोन्ही travel agency पेक्षा कमीच आला.) १५ एप्रिल ते २५ एप्रिल अशी आमची ट्रीप असणार होती.
१५ एप्रिल २०१३, सोमवार
पुण्याहून दुपारी सव्वा तीनची गाडी होती. त्यामुळे मागच्या वेळेसारखी गडबड यावेळी झाली नाही. सगळं आरामात आवरून आम्ही वेळेवर स्टेशनला पोहोचलो. दुरांतो वेळेवर होतीच. ट्रीपच्या नोटस् काढण्याचा खटाटोप मी फक्त दिल्लीच्या ट्रीपलाच केला होता त्यामुळे यावेळच्या railway प्रवासातील काही विशेष गोष्टी आठवत नाहीयेत. दुरांतो असल्याने खाण्याची चंगळ होती - हे तेवढं चांगलं आठवतंय मला...!
१६ एप्रिल २०१३, मंगळवार
जवळपास २८ - २९ तासांचा प्रवास करून आम्ही संध्याकाळी (रात्री) ८ च्या सुमारास कलकत्त्याला पोहोचलो; Pride Plaza हॉटेलमध्ये. चेक-इन करून, फ्रेश होऊन जेवायला गेलो.
१७ एप्रिल २०१३, बुधवार
सकाळपासूनच मळभ - पावसाळी हवा होती त्यामुळे फोटोग्राफीचे बारा वाजणार असं दिसायला लागलं. आवरून, नाश्ता करून आम्ही बाहेर पडलो. ८ तास ८० किलोमीटर या हिशोबाने हॉटेल कडूनच टॅक्सी बुक केली होती. सर्वप्रथम आम्ही व्हिक्टोरिया मेमोरियल बघणार होतो. ढगाळ हवा असली तरी पाऊस नव्हता त्यामुळे फोटो काढता येणार होते.
व्हिक्टोरिया राणीच्या मृत्यूनंतर लॉर्ड कर्झन यांच्या सुचनेनुसार राणीच्या आठवणीत एक भव्य संगमरवरी स्मारक बांधलं गेलं - तेच हे मेमोरियल. १९२० च्या सुमारास याचं बांधकाम पूर्ण झालं. स्मारकाची वास्तू, संग्रहालय, अतिशय सुंदर असा तलाव आणि त्याच्या बाजूला बागा (gardens) असं सर्वकाही आपल्याला बघायला मिळतं. आतमधील gallery - museum बघितल्याचं मला आठवत नाहीये पण मेमोरियलचे बाहेरून मनसोक्त फोटो काढायला मिळाले. तलावाच्या बाजूने गार्डन मधून walking tracks सुद्धा आहेत. आम्ही सुद्धा त्यावरून फेरफटका मारत मारत दुसऱ्या टोकाला येऊन पोहोचलो. तोपर्यंत जवळपास १२.३०-१ वाजत आला होता. तसेच मळभ जाऊन लखलखीत सूर्यप्रकाश देखील आता दिसायला लागला होता. जसजशी दुपार वाढायला लागली तसतसा उन्हाचा त्रास देखील जाणवायला लागला. कलकत्त्याचं हवामान आणि त्यात एप्रिल महिना.
फोटोग्राफी आटपती घेऊन आम्ही पेटपूजा करायला गेलो. तिथून National Library of India बघायला गेलो. National Library of India ही भारतातील सगळ्यात मोठी Library आहे. पांढऱ्या शुभ्र रंगाची आणि हिरव्या रंगाच्या खिडक्या असलेली एक सुंदर इमारत आहे, जिच्यात जवळपास २२ लाख पुस्तकांचा (all type of documents) संग्रह आहे. बाहेरून फोटो काढून (तेव्हा परवानगी होती, आता आहे की नाही माहित नाही.) आम्ही हॉटेलला परत जायला निघालो.
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर flight असल्यामुळे आज जास्त काही प्रोग्रॅम ठेवला नव्हता. रूमवर आल्यावर फ्रेश होऊन मस्त कॉफीचा प्लॅन बनवला कारण पुन्हा एकदा ढगाळ हवा व्हायला लागली होती. कॉफीपान झाल्यावर बाबाने आमच्या भूतानच्या गाईडला फोन लावला. ही ट्रीप बुक केली होती तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं होतं की सोनम नावाची कोणीतरी गाईड तुमच्याबरोबर असेल. (गाईड हा कदाचित मुलगा पण असू शकला असता कारण भूतानमध्ये सोनम हे नाव अगदीच सामान्य आहे आणि ते स्त्रिया व पुरूष दोघेही वापरतात.) कलकत्त्याहून बाबाने जेव्हा फोन केला समजलं की तुमच्याबरोबर कोणीतरी दुसराच गाईड असेल. झालं. मनात शंकेची पाल चुकचुकायला एवढी गोष्ट पुरेशी होती. त्यात भूतानचे सगळे पैसे सुद्धा आधीच भरले होते आम्ही. पण सकारात्मकतेने विचार करण्याशिवाय दुसरं करू तरी काय शकत होतो आम्ही...?
त्याच विचारात पुन्हा एकदा सगळ्या bags नीट लावल्या, जेवण केलं आणि सगळं नीट होईल अशी मनोमन इच्छा करत झोपी गेलो.
१८ एप्रिल २०१३, गुरुवार
आज आमची सकाळी ८.३० वाजता कलकत्ता ते पारो अशी flight होती. त्यामुळे भल्या पहाटे उठून सगळं आवरून आम्ही एअरपोर्टवर जायला निघालो. हॉटेलमधून packed breakfast बरोबर घेतलाच होता. ६.३० च्या सुमारास आम्ही कलकत्त्याच्या नेताजी सुभाषचंद्र बोस इंटरनॅशनल एअरपोर्टवर पोहोचलो. त्याचंच नाव आधी ' डमडम ' असं होतं. सगळे सोपस्कार पार पाडून आम्ही विमानाची वाट बघत बसलो. ब्रेकफास्ट केला. ८.१० - ८.१५ च्या सुमारास गेटकडे जाण्याच्या दिशेने निघालो. फारशी लोकं नव्हतीच. म्हंटलं चला रिकामं विमान दिसतंय. पण विमानात जाऊन बघतो तर आमच्या तीन सीट सोडून बाकी सगळं विमान भरलेलं होतं. त्यातही सोने पे सुहागा म्हणजे त्या तीनही सीट विखुरलेल्या होत्या. कमी वेळेचं विमान (सव्वा तास प्रवास) असल्यामुळे फारसा त्रास झाला नाही. आम्हाला नंतर समजलं की मलेशियाहून आलेली व भूतानला जाणारी लोकंही त्यात होती त्यामुळे आधीच विमान भरलेलं होतं; आणि सीट नंबर नव्हते त्यामुळे ज्याला जिथे हवं तिथे प्रत्येकजण बसला होता.
बरोबर ९.४५ ला आमचं विमान पारो इंटरनॅशनल एअरपोर्टवर उतरलं. डोंगराच्या कुशीत वसलेलं विमानतळ. वातावरणही अगदी प्रसन्न होतं. चालत चालत आम्ही इमिग्रेशन डेस्कपाशी पोहोचलो. भारतीय राष्ट्रीयत्व असलेल्या नागरिकांना व्हिसा लागत नाही. पासपोर्ट किंवा वोटिंग कार्डची गरज लागते. सगळ्या गोष्टी उरकून आम्ही विमानतळाच्या बाहेर आलो. बाबाच्या नावाची पाटी घेऊन आणि खास भूतानी वेशभूषा केलेला एक इसम आम्हाला दिसला आणि आम्ही निश्चित झालो. त्याने त्याची ओळख ' पेमा ' अशी करून दिली. गाडीत आमच्या सकट आमच्या बॅगा त्याने भरल्या आणि आमची स्वारी थिंफूकडे रवाना झाली... By road.
तो इंग्लिशमध्ये बोलेल याची तयारी केली होती आम्ही पण त्याने हिन्दीतून बोलायला सुरवात केली आणि आम्हाला सुखद धक्का मिळाला. "आपको हिन्दी कैसे आती है ?" या आमच्या प्रश्नावर त्याने उत्तर दिलं, "मैं चेन्नईमें पढा हूँ I मेरे भाई - बेहेन भारतमें ही पढ़ते है और भूतानके ५०% लोग हिन्दी ही बोलते है क्यूँकी टिव्ही पे ज्यादातर hindi serials ही दिखाते है I बहुँतसे लोग भारतमें पढ़ाई करने के लिए जाते है I"
आमच्या ड्राईव्हरला मात्र जास्त हिन्दीयेत नव्हतं पण जे येत होतं ते कामचलाऊ होतं त्यामुळे तितकासा प्रश्न आला नाही. त्याचं नाव मात्र लक्षात नाही माझ्या पण तो आणि पेमा दोघेही पूर्ण ट्रीपभर भूतानच्या पारंपारिक वेशातच होते.
पारो ते थिंफू अंतर साधारण दीड तासाचं आहे पण ती वेळ दुप्पट होणार आमच्या बाबतीत हे नक्की होतं. झालं पण अगदी तसंच...
वाटेत Tachog Lhakhang Bridge बघायला थांबलो. (भूतानच्या प्रत्येक वास्तूची नावं मी इंग्लिश मध्येच लिहिणार आहे कारण त्यांचे उच्चार नीट माहित नाहीयेत.) तर आम्ही जो ब्रिज बघायला थांबलो होतो तो Iron Chain Bridge नावाने देखील ओळखला जातो. (हे तसं सोप्पं नाव आहे.) Paro Chhu या नदीवरचा हा ब्रिज आहे. Thangtong Gyalpo याने हा ब्रिज जवळपास ६०० वर्षांपूर्वी बांधला आहे. असे म्हणतात की तिबेट व भूतानमध्ये मिळून त्याने १०८ ब्रिज बांधले होते. लाकूड व लोखंड यापासून बांधलेला हा ब्रिज भूतानमधला सर्वात पहिला ब्रिज आहे.
थिंफूच्या वाटेत पुन्हा एक ब्रेक झाला - tea break. एका रस्त्याच्या कडेला असलेल्या टपरीवर आम्ही चहा प्यायला थांबलो. चहा पिता पिता पेमाने आम्हाला कलकत्त्याहून भूतानला येणारा रस्ता दाखवला. त्याच टपरीवर अजून एक गोष्ट आम्हाला बघायला मिळाली. Bhutan's street food म्हणजेच कुठल्यातरी प्राण्याचं आतडं होतं ते - जे साफ करून त्यात रक्त भरलेलं असतं. त्याबद्दल फारशी चौकशी न करता आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो.
थिंफूला पोहोचायला साधारण १-१.३० वाजला. हॉटेलला चेक इन करून, जेऊन थोडा आराम केला.
दुपारी ४-४.३० ला फिरायला पुन्हा बाहेर पडलो. कडकडीत ऊन आणि थंडगार वारे वाहत होते. सगळ्यात आधी National Memorial Chorten बघायला गेलो. हा एक स्तूप आहे. १९७४ साली तिसरा Druk Gyalpo याच्या सन्मानार्थ हा स्तूप बांधला आहे. पांढऱ्या शुभ्र रंगातील ही वास्तू अतिशय सुंदर आहे. त्यानंतर Dechencholing Palace बघायला गेलो. ५.३० वाजेपर्यंत तिथे सरकारी कामकाज चालू असतं त्यामुळे त्यानंतर तुम्ही तो बघायला जाऊ शकता. भूतानमधील सर्व पॅलेस हे थोड्याफार फरकाने सारखेच दिसतात. पांढऱ्या रंगाच्या भिंती, रंगीबेरंगी - नक्षीकाम केलेल्या लाकडी खिडक्या आणि पिवळ्या किंवा लाल रंगाचे छत. आतील रचना देखील जवळपास सारखीच असते. आपल्याला प्रांगण - प्रार्थनास्थळ बघता येते. (आम्ही बघितलेल्या सर्व पॅलेसमध्ये हेच होतं.) या पॅलेसमध्ये अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे मैदान - चौकोनी स्टेडियमच जणू. याठिकाणी Bhutan Festival आयोजित केले जाते. अंधार पडायला लागल्यामुळे थोडेफार फोटो काढले आणि चालत चालत गाडीच्या दिशेने निघालो. पॅलेसमध्ये जाताना पेमाने आम्हाला Tashicho Dzong (Dzong - झॉन्ग म्हणजेच पॅलेस - राजवाडा.) दाखवला. Dechencholing Palace थोड्या उंचीवर असल्यामुळे तेथून Tashicho Dzong चा अगदी birds eye view आम्हाला बघायला मिळाला. तेथून मग directly हॉटेलवर गेलो, जेवलो आणि आराम केला.



१९ एप्रिल २०१३, शुक्रवार
आज आम्ही सर्वप्रथम बुद्धाचा एक मोठा पुतळा बघायला गेलो - Buddha Dordenma Statue. गोल गोल वळणाच्या रस्त्यावरून आमची गाडी जात होती. (अगदी आपल्या कोकणातले रस्ते असतात तसे.) १७७ फूट उंचीची मूर्ती असल्यामुळे लांबूनही दिसत होती.
एका मोठ्या चौथऱ्यावर ही मूर्ती आहे. आम्ही गेलो तेव्हा मूर्तीचे काम पूर्ण झालेले होते परंतू आजूबाजूच्या परिसराचे काम अर्धवट होते. भूतानचा चौथा राजा Jigme Singye Wangchuck यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त या मूर्तीची स्थापना केली गेली. २००६ साली सुरू झालेले बांधकाम २०१५ साली पूर्ण झाले.
सर्व ठिकाणं आम्हाला बघता येत होती पण वातावरण काही आमच्यावर फारसे प्रसन्न नव्हते. सतत ढगाळ हवा आणि गार वारे... (फिरण्यासाठी उत्तम हवामान होते हे पण फोटोग्राफीसाठी एकदम खराब.)
त्यानंतर आम्ही Royal Preserve - Motithang Takin
Preserve बघायला
गेलो. Takin (Large species of a goat.) हा भूतानचा राष्ट्रीय प्राणी आहे. मूळचे हे एक छोटे प्राणी संग्रहालय होते ज्याचे रूपांतर कालांतराने या Preserve मध्ये केले. Wild Life Photography साठी लागणारी equipments आमच्याकडे नसल्यामुळे आम्ही फक्त डोळ्यांनी बघण्यावरच समाधान मानले. तरी आठवण म्हणून बाबाने २ - ४ फोटो काढलेच. त्याच्याच बाजूला एक हातमाग होता. स्थानिक बायका स्कार्फ - ओढण्या करून विकतात. थोडी फार खरेदी करून - कॉफी पिऊन आम्ही पुन्हा थिंफूच्या main city मध्ये आलो.
Lunch साठी अजून वेळ होता त्यामुळे त्याआधी Jungshi Handmade Paper Factory बघायला गेलो. पुण्यातली फॅक्टरी बघीतली असल्यामुळे साधारण प्रोसेस माहित होतीच पण चित्रकार असल्याने कागदाशी निगडीत कुठलीही फॅक्टरी बघायला मला मजाच वाटते नेहमी. फॅक्टरीत बाबाचं फोटोसेशन चालू असताना आम्ही त्यांच्या दुकानात फेरफटका मारायला गेलो.
नंतर एका रोडसाईड कॅफेमध्ये जेवायला गेलो. शाकाहारी जेवणाचे तसे वांदे होतात पण दाल - कर्ड राईस, बटाटा, कधी कधी पंजाबी (रोटी सब्जी पण लिमिटेड ऑप्शन्स.) आणि कधी कधी indian chinese मिळालं. त्यामुळे अगदीच उपासमार झाली नाही आणि चहा कॉफी देखील सतत मिळत होतीच.
त्या कॅफेच्या समोरच्या रस्त्यावरच भूतान क्राफ्ट मार्केट आहे आणि तेथून पुढे टाटा ग्रुपचं ताज ताशी नावाचं फाईव्ह स्टार हॉटेल आहे. क्राफ्ट मार्केटमध्ये थोडीफार खरेदी केली, ताज ताशी बाहेरूनच बघीतलं आणि चालत चालत National Handicrafts Emporium बघायला गेलो. भूतानचे पारंपरिक कपडे, वस्तू - स्थानिक लोकांनी बनवलेल्या, चपला, मास्क इत्यादी वस्तू तेथे आहेत. अजून पण बऱ्याच वस्तू होत्या आणि एक संग्रहालय देखील आहे.
तेथून हॉटेलला परत जाताना पेमाने आम्हाला थिंफूचं भाजी मार्केट आणि मेन मार्केट पण दाखवलं. एक फेरफटका मारून, tea break घेऊन हॉटेलला पोहोचलो.
२० एप्रिल २०१३, शनिवार
आज आम्ही पुनाखाला जाणार होतो. सकाळपासून जोरदार पाऊस सुरू होता. त्यामुळे गारठा पण खूप होता. नाश्ता करून आम्ही पुनाख्याला जायला निघालो.
वाटेत Dochula Pass (खरंतर 'La' म्हणजेच pass.) बघायचा होता आम्हाला पण पावसामुळे तो मिळेल की नाही बघायला शंकाच होती. पण पुनाख्याला जायचा रस्ता तोच असल्याने आम्ही निघालो. थिंफूहून साधारण पाऊण तासावर Dochula Pass आहे व तेथून दीड तासावर पुनाखा ! तोपर्यंत पाऊस थांबेल अशी आशा होती.
Dochula Pass हा हिमालय पर्वतरांगांमधला एक mountain pass आहे; ज्यात १०८ छोटे छोटे स्तूप (Memorial Chortens) आहेत, भूतानी शैलीत बांधलेले. सर्वात मोठ्या राजमाता (Queen Mother) Ashi Dorji Wangmo
Wangchuck यांनी हा बांधलेला असून त्याला 'Druk Wangyal Chortens' असं देखील म्हणतात. आम्ही तिथे पोहोचलो पण पाऊस काही थांबायचं नाव घेत नव्हता. गाडीतून उतरूनच काय पण आम्हाला गाडीतून पण धड ते बघता आलं नाही. त्या निराशेसकटच आम्ही पुढचा प्रवास सुरू केला.
पुनाख्याला पोहचून, हॉटेलमध्ये चेक इन वगैरे करेपर्यंत लंचची वेळ झालीच. जेऊन, थोडा आराम करून आम्ही पुन्हा ४ - ४.३० च्या सुमारास बाहेर पडलो.
Chimi Lhakhang हे बौद्धमंदिर बघायला जात होतो आम्ही. पाऊस नव्हता पण कधीही कोसळेल असंच वातावरण होतं. हे मंदिर एका छोट्या टेकडीवर आहे आणि तिथे जायचा रस्ता शेतातून जातो. आम्ही जायला निघालो होतो पण दिवसभराच्या पावसाने वाट अतिशय निसरडी आणि चिखलमय झाली होती. रस्ता २० - २५ मिनिटांचाच होता पण अशा परिस्थितीत जायला वेळ लागत होता. पावसाळी हवामानामुळे अंधारून पण आलं होतं आणि नीट फोटो पण काढता आले नसते.
उद्या वेळ मिळाला तर जाऊ परत असं ठरवून आम्ही माघारी फिरलो. तिथल्याच एका कॅफेमध्ये समोरच्या हिरव्यागार शेतांचा नजारा बघत कॉफी प्यायली. आता हॉटेलला परत जाण्यावाचून काहीच दुसरा पर्याय उरला नव्हता. आज दिवसभर पावसामुळे काहीच sightseeing झालं नव्हतं त्यामुळे दिवस तसा वायाच गेला होता आमचा.
पेमा म्हणाला निदान गाडीतून तरी एक चक्कर मारू. म्हणून मग परत एकदा मार्केटमध्ये (पण वेगळ्या रस्त्याने) चक्कर मारली आणि परत येताना एका मोठ्या ब्रिज वर थांबलो. ब्रिजवरून चालताना पेमा काय काय गोष्टी सांगत होत्या, फोटोग्राफी पण चालूच होती आणि आता हवा देखील एकदम pleasent होती... ब्रिजखाली नदीचं विस्तीर्ण पात्र होतं आणि कुठे कुठे नदीचा किनाराही दिसत होता.
पुढे चालताना अचानकच तिथूनच जवळ असलेल्या एका डोंगरावर किल्ल्याची तटबंदी दिसली. दिवसभराची मरगळ नाहीशी झाल्यासारखं झालं एकदम.
आम्ही लगेच पेमाला सांगितलं जाऊया तिथे पण तो म्हणाला की हा Wangdue Dzong आहे. २०१२ मध्ये आगीत जळून खाक झाला. तटबंदी तेवढी राहिली. त्यामुळे आत जायला बंदी आहे आणि आता तिथे restoration चं काम देखील चालू आहे.
झालं... पुन्हा एकदा आमच्या पदरी निराशाच आली. सूर्यास्त पण जवळजवळ झालाच होता त्यामुळे finally आम्ही आमचा मोर्चा हॉटेलकडे वळवला.
२१ एप्रिल २०१३, रविवार
पाऊस नसल्यामुळे आज आम्ही लवकर बाहेर पडलो. मस्त ऊन होतं. आज सर्वप्रथम आम्ही Punakha Dzong बघायला गेलो. पुनाख्याचा हा राजवाडा Pungthang Dewa Chhenbi Phodrang या नावाने देखील ओळखला जातो. ज्याचा अर्थ आहे महान (मोठा) आनंददायी राजवाडा. Mo Chhu आणि Pho Chhu [Pho Chhu (male) and Mo
Chhu (female)] या दोन नद्यांच्या संगमावर वसलेला असा हा राजवाडा आहे. (Chhu म्हणजेच नदी.) भूतानची राजधानी पुनाख्याहून थिंफूला नेली तोपर्यंत संपूर्ण भूतानचे प्रशासकीय केंद्र हा राजवाडाच होता. १९५५ मध्ये राजधानी हलवल्यानंतर आता फक्त पुनाखा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र या राजवाड्यात आहे. Nagwang Namgyal (तिबेटियन बुद्धिस्ट लामा) यांनी १६३७ - ३८ मध्ये या राजवाड्याची स्थापना केली. Second oldest & second largest असा हा भूतानमधला राजवाडा आहे.
भूतानमधल्या सर्व वास्तू दिसायला साधारण सारख्याच असल्याने फार नावीन्य वाटलं नाही पण हवा तसा सूर्यप्रकाश असल्याने मनसोक्त फोटो मात्र काढले. या राजवाड्यासमोर (नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर) एक छोटीशी बाग आहे. तेथून समोरचं विहंगम दृष्य बघीतलं. पुनाखा राजवाडा, त्याच्या बाहेरील Jacaranda झाडं, राजवाड्यात जाण्यासाठी बांधलेला नदीवरचा काळा - लाकडी पूल आणि निळ्या पाण्याच्या Pho Chhu आणि Mo Chhu या नद्यांचा संगम... सगळंच अगदी picture perfect!
राजवाडा बघून झाल्यावर आम्ही तिथे जवळच असलेला Punakha Suspension Bridge बघायला गेलो. तो नजारा बघून स्वतःचा फोटो काढण्याचा मोह मला आवरता आला नाही. त्या ब्रिजवरून थोडं चालत गेले (स्वतःला सांभाळत) आणि बाबाकडून हवे तसे फोटो काढून घेतले. वेगवान वारे आणि ये - जा करणारी माणसं यामुळे तो ब्रिज जास्तच हालत होता. Perfect photo साठी (खरंतर धड उभं राहण्यासाठी) चाललेली माझी धडपड जाणारी येणारी माणसं आश्चर्याने (हसून) बघत होती. स्वतःचा परफेक्ट फोटो काढण्याच्या नादात ब्रिजचा परफेक्ट फोटो तेवढा काढायचा राहिला.
लंच करून आणि मेघराज आज आमच्यावर मेहेरबान होते, तसेच दुसरा काही प्रोग्रॅम नसल्यामुळे आम्ही कालचा अर्धवट राहिलेला प्रोग्रॅम आज पूर्ण करायचा ठरवला - Chimi Lhakhang चा !
साधारण २० मिनटात आम्ही पुन्हा तिथे पोहोचलो. कडकडीत ऊन नसलं तरी पाऊस पण नव्हता. ढग आणि कधी कधी ऊन असा खेळ चालू होता. Chimi Lhakhang हे एक बौद्धमंदिर आहे - एका छोट्या टेकडीवर वसलेलं. हिरव्यागार शेतातून एक पायवाट त्या टेकडीपाशी जाते. फार चढण नव्हती. फोटो काढत आणि त्या वातावरणाचा आस्वाद घेत साधारण ३० - ३५ मिनिटात आम्ही माथ्यावर त्या मंदिरापाशी पोहोचलो. हे मंदिर अंदाजे १४९९ मध्ये बांधलेलं आहे. मंदिरात फोटो काढायला बंदी असल्याने बाहेरूनच फोटो काढतो आणि मग निघूया असं पेमाला सांगताच त्याने आत जायचा आग्रह केला. त्याला न दुखावता आम्ही आत जाऊन दर्शन घेऊन, बाहेरच्या आवारातील फोटोग्राफी करून परतीच्या वाटेवर निघालो.
पुन्हा जोरदार पाऊस पडण्याची चिन्हं दिसू लागली होती पण परत येताना वाटेत एका पडक्या वाड्याचे अवशेष दिसले. हिरव्यागार शेतात तो तपकिरी रंगाचा वाडा फारच उठून दिसत होता. फोटो न काढणं शक्य नव्हतं त्यामुळे photostop घेतला आणि हॉटेलकडे जायला निघालो.
२२ एप्रिल २०१३, सोमवार
आजचा दिवस एकदम आरामशीर होता. आज आम्ही आमच्या भूतान ट्रीपच्या शेवटच्या मुक्कामाच्या ठिकाणी जाणार होतो - पारो ला. सकाळी नाश्ता करून आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली. तीन - साडे तीन तासांचा प्रवास करून आम्ही (चक्क कुठेही न थांबता) पारोला पोहोचलो. हॉटेलमध्ये चेक इन केला. जेवण आणि थोडा आराम करून बाहेर पडलो.
पावसाळी वातावरण आमची पाठ सोडायला तयार नव्हतंच ! त्यामुळे जास्त काही बघता येणार नव्हते. त्यामुळे आम्ही National Museum Of Bhutan बघायला गेलो. खास भूतानी शैलीत बांधलेल्या एका वर्तुळाकार वास्तूमध्ये हे संग्रहालय आहे. जवळजवळ १५०० वर्षांपासूनचा भूतानचा सांस्कृतिक वारसा या संग्रहालयात जतन करण्यात आला आहे; ज्यात भूतानी कला, पोषाख, कांस्य पुतळे (bronze statues) आणि चित्रांचा समावेश आहे.
ते बघून तिथून जवळच असलेल्या एका view point वर गेलो जिथून पारो शहराचा खूप सुंदर नजारा दिसतो. समोर दिसणाऱ्या डोंगररांगा, हळूहळू खाली उतरत येणारे काळे पांढरे ढग बघत बघत आम्ही हॉटेलच्या दिशेने परत जायला निघालो.
उद्याचा दिवस महत्वाचा होता. Tiger's Nest हा ट्रेक करायचा होता. निदान उद्या तरी लख्ख सूर्यप्रकाश यावा आणि आमचा दिवस सफल व्हावा अशी प्रार्थना करतच दिवसाची सांगता केली.
२३ एप्रिल २०१३, मंगळवार
सकाळी लवकर उठून पहिल्यांदा खिडकीबाहेर बघीतलं. उजाडायला लागलं होतं आणि लवकरच सूर्य आपल्या प्रकाशाने पृथ्वी व्यापून टाकणार अशी चिन्हं दिसल्यावर प्रसन्न वाटलं एकदम. त्याच उत्साहात पटापट आवरून, नाश्ता करून आम्ही Tiger's Nest कडे निघालो.
नारायणराव आमच्यावर प्रसन्न दिसत होते आज. पावसाच्या आत वर मॉनेस्ट्रीमध्ये पोहोचायचं होतं त्यामुळे वाटेत कुठेही न थांबता थेट पायथ्याशीच थांबायचं ठरवलं. पायथ्यापर्यंत जाणारा आणि प्रत्यक्ष Tiger's Nest पर्यंतचा रस्ता हा दुतर्फा सूचिपर्णी वृक्ष असलेलाच आहे. त्यामुळे तसाही सूर्यप्रकाश कमीच होता. पायथ्याशी पोहोचलो तोच पुन्हा अंधारून आलं. चढाई सुरू करणार इतक्यात पावसाला सुरुवात झाली. जोरात नसला तरी आमचा प्लॅन फिसकटवण्यासाठी पुरेसा होता. घोड्याने सुद्धा वरपर्यंत जाता येतं पण त्यात फारशी मजा वाटली नाही. (भीती वाटत होतीच ती वेगळी...) पेमा सतत आग्रह करत होता पण नाईलाज होता. निसरडी वाट, गळ्यात कॅमेरे, पावसामुळे no photography त्यामुळे पायथ्यापासूनच आम्ही परत फिरलो. वाटेत एका वळणावरून दुरूनच Tiger's Nest पेमाने आम्हाला दाखवले. तिथूनच दर्शन घेऊन, वाटेत सफरचंदाच्या बागा बघत बघत आम्ही पुन्हा पारो शहराकडे रवाना झालो.
आता हातात बराच वेळ असल्यामुळे दुसरं ठिकाण जे बघणार होतो तिथे गेलो. National Museum of Bhutan च्या पायथ्याशी असलेला Rinpung Dzong. हा किल्ला Paro Chhu च्याच काठावर वसलेला आहे. याची रचना देखील इतर भूतानी वास्तूंप्रमाणेच आहे. पांढऱ्या दगडी भिंती, रंगीबेरंगी लाकडी खिडक्या - दरवाजे, बाजूला नदी, त्यावर असणारा आणि किल्ल्यापर्यंत जाणारा लाकडी पूल... सगळं अगदी तसंच ! इथून हिमालय पर्वत रांगांचं फार मोहक रूप बघायला मिळालं. पावसाने मेहेरबानी केल्यामुळे फोटो देखील काढायला मिळाले.
भूतान मधला हा शेवटचा दिवस होता. त्यामुळे पेमाशी गप्पा मारून, फोटो काढून आम्ही कलकत्त्याच्या परतीच्या प्रवासाच्या तयारीला लागलो.
२४ एप्रिल २०१३, बुधवार
सकाळी ९ - ९.३० च्या सुमारास आम्ही सुखरूप पुन्हा कलकत्त्याच्या हॉटेलला पोहोचलो. फ्रेश होऊन कलकत्ता बघायला निघालो. भूतानच्या अगदी विरुद्ध हवामान इथे होतं. कडक ऊन आणि प्रचंड घाम.
बेलूर मठ, कालीघाट मंदिर, दक्षिणेश्वर काली मंदिर, बिर्ला मंदिर इत्यादी ठिकाणं बघीतली. यापैकी कुठेही फोटो काढायची परवानगी नसल्यामुळे नुसते दर्शनच घेतले (काही ठिकाणी तर लांबूनच.) नंतर 'हलदीराम' मध्ये जेवायला गेलो. तिथे सुकामेवा घातलेली पावभाजी मिळाली. दुसरा काहीही option आणि पुरेसा वेळ नसल्यामुळे त्यावरच समाधान मानून पुढे निघालो.
St. John's आणि St. Paul's अशी दोन चर्च बघीतली. पांढरी शुभ्र आणि बाजूला रंगीबेरंगी फुलांच्या बागा असलेली अतिशय शांत ठिकाणं. दुपारची वेळ असल्यामुळे फारशी गर्दीही नव्हती. त्यामुळे मनसोक्त फोटो देखील काढता आले.
प्रवासाची सांगता करत पुण्याला परत जायच्या तयारीसाठी हॉटेलला जायला निघालो.
२५ एप्रिल २०१३, गुरुवार
सकाळी बरोबर ८.२० ला आमची दुरांतो एक्सप्रेस निघाली कलकत्त्याच्या उकाड्यातून पुण्याचा उन्हाळा अनुभवायला... आणि पुढचे २७ - २८ तास आम्हाला त्या उकाड्यात भूतानच्या थंड हवेची आठवण करून द्यायला...!
अतिरिक्त छायाचित्रे : श्री. शशांक मेहेंदळे
तळटीप : कृपया comment लिहिताना नावासकट लिहावी.